देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्टवादी आघाडीला अनूकूल चित्र दिसत आहे. यापूर्वी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून राज्यातील राजकीय हवा बदलत असल्याचे दिसून येते, असे सांगून ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करून सत्ताधारी विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
लोकसभेसाठी मनसेची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा होऊ शकते, असे संकेतही पवार यांनी दिले. पवार म्हणाले, मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे मोदी व भाजपचे नेते रोज प्रचाराचे नवीन मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तिगत आरोप व टीका करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आता ते जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत.